मला कधी कळलेच नाही...
मी ज्यांना आपले मानले, त्यांनीच माझ्या पाठीवर वार केले.
काहीतरी चुकीचे घडत आहे, हे जाणवत होते; अनेक गोष्टी समजत होत्या. पण ज्यांना आपले मानले होते, त्यांना दुखवायचे नव्हते. म्हणून मी शांत राहिलो.
पाठीत घाव होत राहिले.
विश्वासघातालाही लाज वाटावी, अशी काही कृत्ये माझ्यासमोर घडत होती. सगळे समजत असूनही मी गप्प राहिलो. कारण माझ्या मनात कोणाचे वाईट करण्याची इच्छा नव्हती.
काही पुरावे मिटवले जात होते, काही गोष्टी जाणीवपूर्वक लपवल्या जात होत्या. पण नशिबाच्या लेखणीने लिहिलेला हिशोब कुणालाही पुसता येत नाही, हेही हळूहळू जाणवत गेले.
पडद्यामागे काही जण आपल्या बुद्धीचा, चातुर्याचा आणि ताकदीचा वापर करून मला नामोहरण करण्याचे प्रयत्न करत होते. अंधारातून वार होत होते; प्रत्येक हालचाल जाणवत होती. तरीही मी शांत राहिलो.
कारण मला कोणाला दुखवायचे नव्हते.
या सगळ्याचा परिणाम मनावर होत होता.
रात्र-रात्र झोप लागत नसे. मन अस्वस्थ होत असे. उर भरून येत असे. नको नको ते विचार मनात येत. ज्यांना आपले समजले, त्यांच्याकडूनच असा घात होऊ शकतो, हे स्वीकारणे सोपे नव्हते.
अशा वेळी माझ्या लेकराचे चेहरेसमोर येत असे.
त्याच्यासाठी, त्याच्या भविष्यासाठी आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या माणसांसाठी मनाला पुन्हा सावरावे लागत असे. न पचणारे दुःखही पचवण्याची ताकद मिळत गेली.
पूर्वी संकट आले की डगमगणारा मी, सततच्या संकटांनी हळूहळू बदलत गेलो. वादळ थांबण्याची वाट पाहण्याऐवजी, वादळाविरुद्ध उभे राहण्याची मानसिकता तयार झाली.
राक्षसी प्रवृत्तीशी सामना करताना काही माणसे कोणत्या रूपात, कोणत्या क्षणी आणि कोणत्या कारणाने आपल्या पाठीशी उभी राहिली, हे कदाचित मला कधीच समजले नसते, जर संकटे आली नसती.
या प्रवासाने मला एक गोष्ट मात्र शिकवली—
प्रत्येक जवळचा माणूस आपला असेलच असे नाही आणि प्रत्येक शांत माणूस कमजोर असेलच असे नाही.
ज्यांनी माझे वाईट केले, त्यांचे वाईट करण्याची इच्छा माझ्या मनात कधीच निर्माण झाली नाही. कारण प्रत्येक गोष्टीचा हिशोब स्वतः करण्याची गरज नसते.
काळ आपला हिशोब स्वतः करतो.
कधी परिस्थितीच्या रूपाने,
कधी सत्याच्या रूपाने,
तर कधी अशा माणसांच्या रूपाने, ज्यांच्याकडून आपण कल्पनाही केलेली नसते.
मी हे अनुभवले आहे.
म्हणून आज मागे वळून पाहताना एकच प्रश्न मनात येतो—
माणसे ओळखायला मला इतका वेळ का लागला?
कदाचित उत्तरही तितकेच साधे आहे...
मी माणसांकडे त्यांच्या स्वभावापेक्षा माझ्या मनातून पाहत होतो.
म्हणूनच...
मला कधी कळलेच नाही...
कोण आपले होते आणि कोण फक्त आपले असल्याचे भासवत होते.
Comments
Post a Comment